ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शून्यातून इतिहास निर्माण करणारा लोहपुरुष….. स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे

अक्कलकोट : माणसं जन्माला येतात पण काही माणसं इतिहास निर्माण करतात.सोलापूर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात इतिहास निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुधनीचे माजी नगराध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे हे होत.

संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकात सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नाव राजकीय पटलावर अग्रस्थानी घेतले जाते.  उत्तुंग व्यक्तिमत्व, शब्दप्रभुत्व आणि वेळेला महत्त्व देणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. लहानपणापासून कुस्तीची आवड असल्याने व्यायाम आणि कुस्तीचा फड गाजविणे हा त्यांचा छंद असायचा. सहा फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्व, पांढरा नेहरू, शर्ट, धोतर, टोपी, हातात छत्री हा त्यांचा पेहराव असायचा. अक्कलकोट, कलबुर्गी, अफजलपुर,आळंद या तालुक्यात त्यांचा खूप मोठा दबदबा होता. राजकारणाबरोबर समाजकारणात आपल्या अजोड कार्याची लखलखीत मुद्रा सर्वसामान्यांच्या हृदयावर उमटिवणारे दुधनीचे कार्यसम्राट म्हणून त्यांचे नेतृत्व होते.

सामाजिक कार्याची त्यांना आंतरिक तळमळ होती.त्यांनी गोरगरीब जनतेला व वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे प्रत्येक गावात त्यांचा मित्रपरिवार वाढत गेला.हातात घेतलेले काम तडीस नेण्याची त्यांची हातोटी होती.
म्हेत्रे यांनी तब्बल ५० वर्षे दुधनीचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले.हे महाराष्ट्रातील नव्हे,भारतातील इतिहास आहे.

एकच व्यक्ती ५०वर्षे नगराध्यक्ष पद भूषविलेली व्यक्ती म्हणजे सातलींगप्पा म्हेत्रे होत.म्हेत्रे यांचे घर म्हणजे गोरगरीब लोकांचे न्यायालय होते गावातील तंटे ,भांडणे कोर्टात न मिटणारी प्रकरणे म्हेत्रे साहेबांच्या दरबारात मिटायचे.त्यांचे घर आणि शेत न्याय निवाड्यासाठी जणू न्यायालय वाटायचे.ते अन्नदानाला खूप महत्त्व देत होते.त्यांच्या घरी आलेला माणूस कधी उपाशी जात नव्हता,म्हणून सर्व सामान्यजनतेला ते आपलेसे वाटायचे.ते वेळेला खूप महत्त्व देत होते .रोजची ठरलेली दिनचर्या यावेळी ते सतत व्यस्त राहायचे.

त्याचबरोबर स्वर्गीय मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा स्वभाव शांत , संयमी, सर्वांना आपुलकीने वागवणारा होता. त्या निर्मळ मनाच्या होत्या. मोठा परिवार असल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. त्यांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांच्या घरी गेलेल्या व्यक्तीला जेवल्याशिवाय किंवा अल्पोआहाराशिवाय कधी पाठवलेलं नाही. व्यक्ती कोणत्या कामासाठी आलेला आहे.याची नंतर विचारपूस व्हायची. अगोदर हातपाय धुवून पाहुणचार व्हायचा. हे म्हेत्रे घराण्याचे वैशिष्ट राहिलेलं आहे .हे मातोश्री व साहेबांचे संस्कार अखंडपणे, अविरत आजपर्यंत सुरु आहे.

राज्याच्या राजकारणात सहकारमहर्षी कै.शंकरराव मोहिते- पाटील ,अनगरचे कै.बाबुराव अण्णा पाटील यांच्यात असलेले सौख्य सर्वश्रुत आहे. अलीकडेच सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडलेला होता.देशाचे माजी गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ,आमदार प्रणिती ताई शिंदे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरम सिंग, खासदार मल्लिकार्जुन खरगे, आमदार बी.आर .पाटील, बसवराज पाटील, भाई छन्नूसिंग चंदीले, निर्मला ताई ठोकळ, बी.टी. माने, महादेव पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्री पूर्ण संबंध होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांची मैत्री होती. त्यांचे पुत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.त्यावेळी त्यांना खूप अभिमान वाटला होता. शरण बसवेश्वर, मल्लिनाथ , सिद्धाराम, शंकर या मुलांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते.

हे सर्व मोठे असले तरी वडिलांच्या समोर कधी जात नव्हते,आदरयुक्त भीती त्यांना असायची.आज त्यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करताना असे वाटते मातोश्री लक्ष्मीबाई व सातलिंगप्पा साहेब हे आपल्यातच आहेत. प्रत्येक गोर गरीब जनतेच्या हृदयात आहेत.त्यांच्यावर प्रेम करणारे लोक अफाट आहेत.त्यांनी केलेल्या संस्कारामुळे पुढची पिढी यशाच्या शिखरावर पोहचलेली आहे.त्यांचे आदर्श व संस्कार भावी पिढीने अंगीकारले पाहिजे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

सातलिंग शटगार (सर)सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!