अक्कलकोट : ‘मरावे पण कीर्तीरूपे उरावे’ हि म्हण नेहमी आपल्याला ऐकायला मिळते .आपण किती आयुष्य जगलो हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगलो त्यामध्ये असे काही चांगले कार्य केले कि लोक आपल्याला, आपल्या मृत्यू नंतरहि स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील. खरे तर ‘मरावे पण कीर्तिरूपे उरावे’ हे समर्थ रामदासांचे बोधवचन आहे.
समर्थांनी अतिशय छोट्या शब्दात परंतु अतिशय मोलाचा उपदेश केला आहे. मग यासाठी काय करावे लागेल? उत्तर अगदी सोपे आहे. यासाठी अनेक सत्कृत्य करावे लागतील, इतकी सत्कृत्ये करावे लागतील कि ज्यायोगे आपली कीर्ती सर्वत्र होईल व आपण मरण पावलो तरीही लोक आपले नाव घेत राहतील, अगदी अशाच प्रकारचे कार्य अक्कलकोट तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी कृषी बाजार समितीचे सभापती स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे होते. आज त्यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्यांच्या कार्यावर नजर टाकत असताना त्यांच्या कार्याच्या उल्लेखशिवाय तालुक्याचा इतिहास पूर्ण होणार नाही, हे मात्र नक्की.शेवटपर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अक्कलकोट व दुधनी बाजार समितीचे दोन वेळा चेअरमनपद भूषविले. दुधनी नगरपरिषदेवर सर्वाधिक काळ ते नगराध्यक्ष राहिले. २१ नोव्हेंबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला.
अक्कलकोट तालुक्यासह अफजलपुर,आळंद,गुलबर्गा या तीन तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्या परिसरातील न्यायनिवाडे ते चांगल्या पद्धतीने करत असत. सामाजिक, कौटुंबिक, शेती विषयक तंटे त्यांच्याकडून सोडवले जात असत.अगदी सुप्रीम कोर्टात गेलेले प्रकरण सुद्धा दुधनीच्या जनता दरबारात ते निकाली काढत असत.
तालुक्यात त्यांना भीष्मपितांमह म्हणून ओळखले जायचे.सर्वप्रथम ते १९५९ ते १९६५ मध्ये ५ वर्ष, १९६७ ते १९८० असे १३ वर्ष, १९८६ ते १९९५ असे ९ वर्ष,१९९६ ते १९९७ मध्ये १ वर्ष,२००९ ते २०११ असे ३ वर्ष अशा पद्धतीने त्यांनी दुधनी नगरपरिषदेचा सर्वाधिक एक हाती कारभार सांभाळला. अनेक वर्षे ते बिनविरोध दुधनीचे नगराध्यक्ष होते. त्यांचा शब्द तालुक्यात प्रमाण असायचा.
१९७४ ते ८२ या काळामध्ये ते अक्कलकोट बाजार समितीचे चेअरमन देखील होते. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात काँग्रेस वाढविण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.त्यांच्यामुळे अजूनही काँग्रेस पक्ष जिवंत आहे. स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे संबध देखील खूप चांगले राहिले आहेत. त्यामुळे म्हेत्रे यांना राज्यात मंत्रिपद मिळाले.१९७४ च्या काळात ते खूप क्रियाशील नेते होते. स्व.नामदेवराव जगताप,स्व.भाई छन्नूसिंग चंदेले यांच्याशी त्यांची दृढ मैत्री होती.
तेंव्हापासून ते आज पर्यंत अक्कलकोट काँग्रेसची भिंत अभेद्य राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही नाकारून शकत नाही. विशेष म्हणजे ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहिले. त्यांच्यानंतर आता माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे हे देखील त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. याच्या पुढची पिढी म्हणून युवा नेते शिवराज म्हेत्रे, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना तालुका आशेने पाहत आहे.
आता यापुढील काळातही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे आणि त्यांची स्वप्न पूर्ती करणे हीच त्यांना प्रथम पुण्यस्मरणदिनी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. नुसते जन्माला येणे व आयुष्य संपल्यावर मरून जाणे, अश्या जीवनाचा काही अर्थ नाही. यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात अश्या प्रकारे जगावे कि शरीराने मरून सुद्धा तो कीर्तीरूपाने जिवंत राहिला पाहिजे. असे कार्य सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मारुती बावडे,अक्कलकोट
९९६०१३११७४