महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी बंदला अक्कलकोटमध्ये संमिश्र प्रतिसाद, तिन्ही पक्षांकडून तहसीलदार शिरसाट यांना निवेदन
अक्कलकोट,दि.११ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अक्कलकोट महाविकास आघाडीच्यावतीने अक्कलकोट शहरात बंद पाळण्यात आला.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.या बंदला सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि शिवसेना, प्रहार, स्वाभिमानी या पक्षातील प्रमुख नेत्यांनी या बंद मध्ये सहभाग घेत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
यासंदर्भात रविवारीच बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला होता. सकाळी बस स्टँड पासून या निषेध मोर्चाला सुरूवात झाली.त्यानंतर कारंजा चौक,फत्तेसिंह चौक,सेंट्रल चौक मार्गे जुना तहसील येथे तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यापूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, लहुजी शक्ती सेनेचे वसंत देडे ,दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त करत केंद्रातील भाजपा सरकारवर कडाडून टीका केली.यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.
केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांवरती अन्याय सुरू आहे. हा अन्याय आता यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र येत आम्ही वेळोवेळी त्यांची ही दादागिरी मोडून काढणार आहोत. याला निवडणूकीच्या माध्यमातून देखील आम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले.
बंदमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पूर्ण शक्तिनिशी उतरली होती. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी जाहीर प्रमाणे आज अक्कलकोट शहरामध्ये त्याचा परिणाम दिसून आला.दुपारनंतर थोडा अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात मात्र मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारात बंद पाळण्यात आला होता.
दुधनी आडत बाजार मधील संपूर्ण व्यवहार आज बंद होते. त्याची अक्कलकोटमध्ये ही आज सौदे बंद असल्याची माहिती मिळाली. या मोर्चा दरम्यान दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे, उपसभापती प्रकाश हिप्परगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, नगरसेवक सद्दाम शेरीकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल पाटील, वैशाली चव्हाण, सुनिता हडलगी,माया जाधव, शिवसेनेचे योगेश पवार, प्रवीण घाटगे, विलास गव्हाणे आदींसह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बस सेवा झाली विस्कळीत
आज सोमवार आठवडे बाजार होता तरीही व्यापारी आणि नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अक्कलकोट आगाराने दुपारी एक वाजेपर्यंत बस सेवा बंद ठेवली होती.या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.