दक्षिण सोलापूर : तालुक्यातील इंगळगी ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी वळसंगे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव सहा विरुद्ध एका मताने मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.
सात महिन्यापूर्वी नऊ सदस्य असलेल्या इंगळगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी विद्याधर वळसंगे यांची निवड झाली होती. मात्र त्या गावचा कारभार करताना इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याची तक्रार करीत काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा तहसीलदार कुंभार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी सरपंचावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने ग्रामपंचायत सदस्य बशीर शेख गंगाराम पाटील सिद्धेश्वर घोडके गोदावरी गुरव कांताबाई माने व मंगल हरणे यांनी मतदान केले. तर ठरावाच्या विरोधात सरपंच लक्ष्मी वळसंगे यांना स्वतःचे एकच मत मिळाले. या सभेस विनोद बनसोडे व पार्वती वंजारे हे दोन सदस्य गैरहजर राहिले.