ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देवेंद्रजी फडणवीस व भाजपाविषयीचा तिरस्कार, उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून व्यक्त झाला -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टिका

मुंबई दि. १५ ऑक्टोबर- महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारचे दोन वर्षातील योगदान व सरकारची पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोटयवधी जनतेला आजच्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मुंबईच्या कामाची काय स्थिती आहे.हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. आजच्या भाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस व भाजपा विषयीचा टोकाचा तिरस्कार व तिडीक वारंवार व्यक्त होताना दिसत होती अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणासंदर्भात प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, हिंदुत्व व मराठीविषयीची भूमिका पुन्हा अधोरित करण्याचा उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा आज हिंदुत्वाचा विषय उपस्थित करावा लागला हे सुध्दा उल्लेखनीय आहे. कारण हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणा-यांच्या बाजूला केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून आचार विचार बाजूला सोडून शिवसेना सत्ता उपभोगत आहे आणि भाजापावर सत्तेसाठी वाटेल ते अथवा सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते असा सवालही दरेकर यांनी केला.

गेली २५ वर्षे शिवसेना व भाजपा एकत्र असल्यामुळेच शिवसेनेला प्रत्येक निवडणुकांमध्ये यश मिळाले. मागील विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला सर्वाधिक जनाधार दिला. सर्वात जास्त जागाही जिंकून दिल्या. तसेच आजही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपाला सर्वाधिक यश मिळाले आहे व सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला असल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच पंढरपूरच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे, देगलुरच्या निवडणुकीत सुभाष साबणे हे उपरे असे म्हणणारे तुमच्या मंत्रीमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे किती निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्री मंडळात आहेत, याचे उत्तरही शिवसेनेने द्यावे. सध्यांच्या मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख तर खासदार प्रियांका चतुर्वेदी ही मंडळी तर उपरीच आहेत ना असा सवालही दरेकर यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!