ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान 2021 ची प्रभावी अंमलबजावणी – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि.16 : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, सोलापूर महापालिका व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान 2021 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम हाती घेतले असून त्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दुरचित्र प्रणालीद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियान 2021 च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती मध्ये माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश व वायू या पंचतत्वानुसार विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत.या अंतर्गत 48 हजार 131 वृक्षांची लागवड केलेली असून त्यातील 43 हजार 829 वृक्षाचे संवर्धन झालेले आहे. तसेच सर्व नगरपालिका क्षेत्रात हेरिटेज वृक्षाची गणना सुरू झालेली असून आत्तापर्यंत 544 वृक्ष हेरिटेज म्हणून नोंदवले असून त्यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत पंचवीस रोपवाटिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 20 रोपवाटिकेची निर्मिती केलेली आहे. तर सर्व नगरपालिका हद्दीत नव्याने तयार केलेल्या हरित क्षेत्रची एकूण संख्या 37 इतकी आहे तर त्याचे एकूण क्षेत्रफळ 88 हजार 87 चौरस मीटर इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी देऊन बार्शी व पंढरपूर येथे अमृत वनांची निर्मिती केलेली असून बार्शी येथे फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत संकलित व विलगीकृत कचरा बारा नगरपालिकेत 100% केला जातो तर उर्वरित नगरपालिकेत 80 ते 90 टक्के कचरा संकलित करून विलगीकरण केले जाते. कचऱ्यातून एकूण 113 टन कंपोस्ट निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यातील पंधरा नगरपालिकांनी फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबविण्याबाबत चा ठराव केला व त्या ठरावाची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिली.

इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 अंतर्गत शहरी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याबाबत प्रोत्साहन दिले जात असून आजपर्यंत 482 लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केलेली असून पुढील काळात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत प्रबोधन मोहीम राबवली जाणार असल्याचे श्री शंभरकर यांनी म्हटले. तसेच जलसंधारण अंतर्गत एकूण 40 उपक्रम सुरू केलेले असून त्यातून 854 घनमीटर पाण्याचे संवर्धन होणार असून 14 शासकीय कार्यालयांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. तर अक्षय ऊर्जा उपक्रमांतर्गत 42 उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेने वसुंधरा अभियानाअंतर्गत 25 हजार वृक्षांची लागवड केलेली असून त्यातील 17 हजार वृक्ष जिवंत आहेत तर कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प नियोजित असल्याचे सांगून पुढील काळात सीएनजी गॅस निर्मिती करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल ट्रॅक बनविण्यात येणार असून रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी मालमत्ता करात सवलत दिली जात असून महापालिकेच्या सर्व इमारती 100% रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाणार असून सिद्धेश्वर तलावाचे सुशोभीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेले असून कंबर तलाव येथे लवकरच बोटींगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शिवशंकर यांनी देऊन महापालिकेच्या हद्दीत वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

वसुंधरा अभियानांतर्गत जिल्ह्यातील 706 गावांमध्ये विविध उपक्रम राबविले जात असून 626 ग्रामपंचायतीने फटाके बंदीचा ठराव करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली होती. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत या अभियान अंतर्गत प्रबोधन केले जात असून ग्रामीण भागात वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने वेबिनार चे आयोजनही केले असून वसुंधरा अभियानाची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी साठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद व सर्व नगरपालिका क्षेत्रात योग्य पद्धतीने माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी होत असल्याचे सांगून डेटा कलेक्शन चे काम चांगले असल्याबद्दल कौतूक केले. ते पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांची व्ही.सी. द्वारे वसुंधरा अभियानांतर्गत राबवलेल्या उपक्रमाची माहिती घेत होते. हे अभियान राबवण्यासाठी सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते.

ठळक मुद्दे

● बार्शी येथे फुलपाखरू उद्यान निर्माण करण्याचे प्रस्तावित

● कंबर तलाव येथे लवकरच बोटींगची व्यवस्था

● स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल ट्रॅक बनविण्यात येणार

● माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्ह्यातील 706 गावांमध्ये विविध उपक्रमांची अंमलबजावणी

● महसूल आयुक्त सौरभ राव यांच्याकडून माझी वसुंधरा अभियानात सुरू असलेल्या

कामाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे कौतुक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!