मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. झाले ते उत्तम झाले. ‘संघर्षरत शेतकऱ्यांना सलाम’, अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रपुरात व्यक्त केली.
खासदार संजय राऊत, शिवसेना – कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. सात वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानांनी जनतेचा आवाज ऐकला. मात्र यासाठी चारशे शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले हे दुर्दैवी आहे असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
कृषीमंत्री दादा भुसे – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय आधी झाला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो. ऊन, वारा, पाऊस सहन करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे क्रेडिट असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस – झालेली चूक सुधारत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
नवाब मलिक, अल्पसंख्याकमंत्री – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.