…तर 12 डिसेंबर पर्यंत युवक काँग्रेसची सभासद नोंदणी वाढली असती : डाॅ.बगले, दक्षिण सोलापूरच्या भूमिकेवर ठाम : वादाबद्दल भूमिका स्पष्ट.
सोलापूर : – युवक काँग्रेसच्या मुदतपूर्व नेमणूका जाहीर करतांना दक्षिण सोलापूर मतदार संघातील सर्वांना विश्वासात घेऊन,राजकीय समिकरणांचा अभ्यास करून,सामुदायिक निर्णय झाला असता तर 12 डिसेंबर पर्यंत युवकांची सभासद नोंदणी आणखी वाढली असती,अशी सकारात्मक भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांनी मांडली. दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष निवडताना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांना बोलावून ईच्छुकांसह सर्वांची मते जाणून घेतली होती.त्यांना सर्वाधिकार दिल्यानंतरच तालुका अध्यक्षांची नियुक्ती केली होती.याचीही आठवण डाॅ.बगले यांनी करून दिली.
युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणीत हस्तक्षेप करून अचानक मुदतपूर्व नांवे जाहीर केल्याने वादंग निर्माण झाला असून त्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर बगले यांनी आपली भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की,ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जिल्हा मला गेल्या 31वर्षापासून ओळखतो. मी जिल्हा किंवा तालुक्याचा सोडाच पण माझ्या गावचा सुध्दा नेता नाही.पण पक्षासाठी माझे योगदान काय आहे याची माहिती दक्षिण सोलापूरला आणि सुशीलकुमार शिंदे यांना आहेच.कारण 1990 साली म्हणजेच 31 वर्षापूर्वी मी एन.एस.यु.आय.या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो.त्यानंतर युवक संघटनेचा तालुका अध्यक्ष व युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस म्हणून जिल्हा स्तरीय युवकांचे संघटनकौशल्य हाताळण्याचे काम 25 वर्षापूर्वीच केले आहे.त्यानंतर आज तालुका आणि जिल्हा काँग्रेसचे काम निष्ठापूर्वक करत आहे.केवळ मला राजकीय वारसा नसल्यामुळेच पक्षांकडून माझ्यावर अन्याय झाला.अशी खंत त्यांनी व्यक्त केली.म्हणूनच 2011 साली राष्ट्रवादीत प्रवेश केला.राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी माझे संघटन कौशल्य पाहून सलग 9 वर्षे तालुका अध्यक्षपदाची संधी दिली.संपूर्ण जिल्ह्यांने माझी कार्यशैली अनुभवली आहे.असेही ते म्हणाले.
दरम्यान 2017 साली सोलापूर शहरातील विजापूर रोड भागातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली.राष्ट्रवादीत जाण्याचे कारण मी जाहीर केले तर पक्षाची खूप मोठी हानी होईल.म्हणून मी संयम राखतो,असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत नेतृत्वाकडून समन्वय न घडल्याने अनेक दिग्गज मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली.तालुका नेतृत्वहिन झाल्याने उमेदवार एकटाच फिरत होता.त्याला कुणी ओळखतही नव्हते.तेव्हा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.दुसर्याच दिवसांपासून निवडणूक खांदयावर घेतली.ईतर सर्व ज्येष्ठ मंडळीना पटवून सांगून निवडणुकीत कॉंग्रेसचा झंझावात निर्माण केला.हे अख्या तालुक्याला माहिती आहेच.
● वादाचा मुद्दा दक्षिण सोलापूरचा…!
युवक काँग्रेसच्या वादाबद्दल छेडले असता डाॅ.बसवराज बगले म्हणाले की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या घटनेतील तरतुदी प्रमाणे लोकशाही मार्गाने युवकांची सभासद नोंदणी आणि मतदान प्रक्रिया 12 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.पक्षात युवकांची संख्या वाढावी हा पक्षाचा मुख्य हेतू आहे.
सोलापूर शहरात,शहर मध्य आणि शहर उत्तर मतदार संघात कुणी काय निर्णय घ्यायचा त्याबाबत बोलण्याचा माझा काहीच संबंध नाही,त्याबद्दल मी कुठेही जाहीरपणे बोललोही नाही.दक्षिण मतदार संघातील चारही युवक उमेदवारांच्या संपर्कात राहून सभासद नोंदणी व मतदानाचा पाठपुरावा दररोज करत असतांना अचानकच आमदार कु.प्रणितीताई यांनी एकतर्फी उमेदवारी जाहीर करून टाकली.त्यामुळे मतदार संघातील राजकीय समीकरण बिघडले.एका युवक उमेदवारांने धनगर समाजावर काँग्रेसकडून नेहमीच अन्याय होत असल्याचा राग व्यक्त केला,पंरतु यासंबंधी प्रदेश नेतृत्वाला विचारण्याची पात्रता आमची नाहीच.केवळ ‘ वयाने मोठा आणि अनुभवाने प्रगल्भ ‘ असल्यामुळेच पक्षशिस्त पाळून खाजगीत प्रदेश निरीक्षकांशी याबाबत चर्चा केली.माध्यम प्रतिनिधीने याचे प्रसिद्धीकरण केले,त्यामुळे शहर युवक पदाधिकारी यांचा गैरसमज झाला असावा.त्यांनी त्यांची भूमिका मांडली,त्यात काही गैर नाहीच.लोकशाहीत त्यांचा अधिकारच आहे,कारण ते खरे निष्ठावंत आहेत.असेही बगले यांनी मान्य केले.● युवक स्टाईला ताईंचा दुजोरा.
प्रत्यक्षात सोलापूर शहर युवक काँग्रेस कार्यक्षम आहे.आपल्या नेतृत्वावर अन्याय झाला तेंव्हा राज्याचे प्रभारी व केंद्रीय नेते मल्लिकार्जून खरगे यांची प्रतिमा जाळून आपली ‘ स्टाईल ‘ दाखवून दिली होती.आत्ता माझ्याबद्दल गैरसमज झाल्याने आपल्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.ते योग्य असल्याचा दुजोरा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कु.प्रणितीताई शिंदे यांनीही दिला आहे.त्याबद्दल मी काही तरी बोलणे गैर ठरेल. त्यामुळे शहराच्या वादात न पडता माझा मुद्दा फक्त दक्षिण सोलापूर मतदार संघापुरता मर्यादित आहे.ही माझी ठाम भूमिका आहे.परंतु शहर आणि ग्रामीणचा वाद किंवा विभागणी होवू नये हीच अपेक्षा आहे.कारण मी सुद्धा शहरातील मतदार – नागरिक आहे.आपल्या मतदार संघाबद्दल आणि पक्षाविषयी ईतराप्रमाणेच मलाही अभिमान आहेच,असेही बगले म्हणाले.
● आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करणार
एक निगर्वी,संयमी,व्यापक समन्वयाचे धोरण ठेवणारे,सर्वांना न्याय देणारे एक सर्वमान्य नेते म्हणून सुशीलकुमार शिंदे हे देशात ओळखले जातात.राजकीय विरोधक सुध्दा यांना सोलापूरचे राजकीय ” बाप ” म्हणून कबूल करतात.मागील दोन महिन्यापूर्वी काँग्रेस भवनासमोरील फलकावर शाई आणि दगड टाकून कुणीतरी राग व्यक्त केला.याची खंत वाटली.आज पर्यंत त्या निंदनीय घटनेचा तपासही लागला नाही.काँग्रेस आमदारांच्या मतदार संघात देशाच्या नेत्यांचा अपमान झाला.त्याचा तपास होण्यासाठी युवक काँग्रेसने आत्ता आपली स्टाईल वापरून आंदोलन केले पाहिजे.अन्यथा त्या काळ्या घटनेचा तपास होऊन नाराज कार्यकर्ते तसे का वागले ? हे जाहीर होण्यासाठी आपण स्वतः काँग्रेस भवनासमोर एक दिवस ” आत्मक्लेष आणि अन्नत्याग आंदोलन ” करणार असेही डाॅ.बसवराज बगले शेवटी म्हणाले.