सचिन पवार
कुरनूर,दि.२ : दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांना फटका बसल्याचे चित्र आता तालुक्यात दिसत आहे. गुरुवारी दिवसभर अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले दुपारनंतर अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून विशेषता द्राक्षे,कांदा,टोमॅटो यासारख्या अनेक फळबागांना आणि पिकांना मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्षाकरिता दावण्या आणि बुरशी रोगाला हे वातावरण आमंत्रण देणारे आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.तूर काढणीला आले असता अवकाळी पाऊसाने निर्माण झालेले कीटक यामुळे तुरी सारख्या पिकाला नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो पिकांना ही त्याची झळ बसली आहे.हवामान खात्याने पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.
या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे.आधीच कोरोना संकट, वाढलेली महागाई त्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका यामुळे शेतकरी आणि सामान्य माणूस हवालदिल झाला
आहे.
कांदा उत्पादक संकटात
या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने त्यात पुन्हा अवकाळी पावसाचा बसलेला फटका. यामुळे लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी – उमाकांत खांडेकर, शेतकरी