सोलापूर: जलस्थानाच्या प्रदूषणाचे व द्योतक व निसर्गातील बयालाजिकल इंडीकेटर म्हणून ओळख असलेले वारकरी हा पाणपक्षी शिकाऱ्यांमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील उजनी जलिशयासह इतर छोट्यामोठ्या पाणवठ्यावर मुक्त विहार करणारे हे पक्षी शिकाऱ्यांना बळी पडत असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे.
या पक्ष्याबद्दल पक्षी अभ्यासकांकडून मिळालेली माहिती अशी की- भारतीय मूळ निवासी असलेला हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. या पक्ष्याच्या चोचीपासून कपाळापर्यंत हस्तीदंतासारखा पांढरा नाम असतो. या कारणावरून याला नाम्यापक्षी हे नाव दिले आहे. इंग्रजीत याला कूट असे नाव आहे. हा नाम पंढरीच्या वारकऱ्यांच्या कपाळावरील नामाप्रमाणे असल्यामुळे वारकरी पक्षी असेही नाव पडले आहे. छोट्या व घट्ट बांध्याचा हा पक्षी करड्या रंगाचा असतो. शरीराची खालची बाजू फिक्कट रंगाची असते. डोके आणि मान गडद काळ्या रंगांची असतात. डोळे लाल आणि पाय हिरवट रंगाचे असतात. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात त्यामुळे हे पक्षी बदकांसारखे लीलया पाण्यात पोहू शकतात.
पाण्यात बुडी मारून भक्ष्य मिळविण्यात हा पटाईत आहे. मासे, गोगलगायसह इतर जलचर कीटक हे प्रमुख खाद्य असून पाणवनस्पतींचे कोवळी पाने व कोंब खातात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने समूहाने वावरतात व स्थानिक स्थलांतर करतात. पाण्यात खूप खोलपर्यंत बुडी मारून मासे पकडून पुन्हा पाणपृष्टावर येऊन खात बसणे या पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे. बऱ्याच वेळा विश्रांती साठी पाण्याच्या काठावर समूहाने बसलेले असताना दिसतात. हा पक्षी शक्यतो उडत नाही. पाण्यातून हवेत उडताना कष्ट घ्यावे लागते. शत्रू व माणसाची चाहूल लागली की पंख फडफडावून अर्धवट उडत हे काही अंतरापर्यंत जाऊन परत पाण्यात तरंगतात; मात्र एका पाणस्थळावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना जोराने उडतात.
या पक्ष्यांमधील नर-मादीत फरक जाणवत नाही; मात्र विणीच्या काळात नर पक्षी गडद काळा दिसतो शिवाय वागण्यात अतिशय आक्रमक बनतो. पाण्याच्या काठावर वाढणाऱ्या पाणकणिसाच्या गचपणीतील आडोशाला जोडीने हे पक्षी काटक्या वापरून उथळ घरटी बांधतात. मादी त्यात मध्यम आकाराची पाच ते सहा तांबूस करड्या रंगांची अंडी ठेऊन उबवते. उबवणीनंतर जन्माला आलेली पिल्ले पाळीव कोंबड्यांच्या मादी पक्षी बरोबर वावरत असतात.
“वारकरी पक्षी हे बदके नसून ते पाणपक्षी आहेत. दूषित पाण्याची सरोवरे, तलाव, नद्या इत्यादी जलस्थानावर हमखास आढळतात. जिल्ह्यातील उजनीसह इतर सर्वच पाणस्थळांवर हे पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो. याचा अर्थ जिल्ह्यातील नद्यांसह सर्वच तलाव व सरोवरे दूषित झाले आहेत. प्रदूषित पाण्याचे द्योतक असलेले ह्या पक्ष्यांचे शिकार होते हे निंदनीय प्रकार आहे – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक.