शरद पवारांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार टिकून : म्हेत्रे,पवारांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये कार्यक्रम
अक्कलकोट : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे बहुआयामी आणि सर्वस्पर्शी नेते असून त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. हा चमत्कार केवळ पवार यांच्यामुळेच आणि त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळेच झाला आहे, असे गौरवोद्गार माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आला. यावेळी व्हर्चुअल सभेद्वारे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, रूपालीताई चाकणकर आदी प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुंबई येथे प्रदेश कमिटीकडून झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी, संजय देशमुख यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे म्हणाले, शरद पवार यांनी गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत.ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. प्रारंभी या कार्यक्रमाचे उदघाट्न म्हेत्रे यांच्या हस्ते झाले.
यावेळी अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, जेष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, अशपाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, बाळासाहेब मोरे, फत्तेसिंह संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, विलास गव्हाणे आदी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांचा जीवनपट देखील उलगडून दाखवला गेला. या कार्यक्रमाला प्रा. प्रकाश सुरवसे, शिवराज स्वामी, शंकर व्हनमाने, माणिक बिराजदार, माया जाधव, सुरेखा पाटील, ज्ञानेश्वर बनसोडे, स्वामीनाथ चौगुले, अविराज सिद्धे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, शरदप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.