सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत 45 विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु होते. मार्च 2021 अखेर जिल्ह्यातील 19924 एवढ्या बालकामगारांना कामापासून मुक्त करुन या विशेष प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला होता. सध्या केंद्रातील दोन वर्षांचा कालावधी संपल्याने 17465 एवढ्या बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक निलेश येलगुंडे यांनी सांगितले.
12 जून रोजी बालकामगार प्रथाविरोधी दिन…यानिमित्त शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत ९ ते १४ वयोगटातील धोकादायक व बिगरधोकादायक उद्योग, व्यवसाय, आस्थापना व विविध प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प डिसेंबर १९९५ पासून सुरु आहे. प्रकल्पाअंतर्गत विविध स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु करुन सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बालकामगारांना प्रवेश देऊन त्यांना वयानुरुप शिक्षण व व्यवसायपूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
या बालकामगारांचा विशेष प्रशिक्षण केंद्रामधील कालावधी हा कमीत कमी ३ महिने ते जास्तीत जास्त २ वर्षाचा असतो. प्रत्येक केंद्रामध्ये कमीत कमी १५ जास्तीत जास्त ५० बालकामगारांना प्रवेश देण्यात येतो. या कालावधीमध्ये प्रत्येक बालकामगारास त्यांच्या केंद्रातील उपस्थितीनुसार दरमहा रु.४००/- इतके विद्यावेतन त्यांचे बँक खात्यामध्ये डी.बी.टी. प्रणालीव्दारे केंद्र शासनामार्फत जमा करण्यात येते. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहार, वैद्यकीय सुविधा देखील पुरविण्यात येतात. या बालकामगारांच्या कुटुंबियांचा आर्थिक स्तर उंचाविणेकामी शासनाच्या विविध योजनांचादेखील लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
केंद्र शासनाने 2018 पासून विकसित केलेल्या (www.pencil.gov.in) पेन्सिल पोर्टलव्दारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांचे सर्व कामकाज ऑनलाईन सुरु आहे. यामध्ये सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बालकामगारांची संपूर्ण माहिती, प्रवेशाबाबतची माहिती, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची व विशेष प्रशिक्षण केंद्राविषयीची माहिती, कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविण्यात येते. बालकामगारांची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती, बालकामगारांचा बँक खाते तपशील, प्रगती अहवालाबाबत, शिक्षणाच्या प्रवाहात दाखलबाबत, वेळच्या वेळी नोंदी ठेवण्यात येतात.
बालकामगारांची दररोज ऑनलाईन हजेरी घेण्यात येते. प्रकल्पाच्या इतर कामकाजाची उदा. तिमाही प्रगती अहवाल, वार्षिक प्रगती अहवाल, अनुदानाच्या विनियोगाची माहिती, लेखापरीक्षण अहवाल, अनुदान विनियोग प्रमाणपत्र, लायबलेटी स्टेटमेंट, जनजागृती अहवाल, कर्मचारी प्रशिक्षणाबाबत आदीबाबतची माहिती ऑनलाईन नोंदी करण्यात येतात.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नव्याने विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून बालकामगारांच्या सर्वेक्षणासाठी निधी प्राप्त झालेला असून सध्या कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सर्वेक्षण करता येत नाही. बालकामगारांचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. बालकामगार अनिष्ट प्रथेबाबत जनमाणसामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रकल्पाच्यावतीने वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे श्री. यलगुंडे यांनी सांगितले.