राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सीमा भागातील २८ गावे विकासापासून वंचित ; कर्नाटकात जाण्याची इच्छा, विविध ग्रामपंचायतींचा ठराव
अक्कलकोट, दि.१ : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावाद प्रचंड तापला असताना अक्कलकोट तालुक्यातील २३ व दक्षिणमधील ५ गावे कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेल्या असुविधा. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले तरी रस्ते, पाणी आणि विजेचे प्रश्न जैसे थे राहिल्याने नागरिक वैतागून अशा प्रकारची मागणी करत समोर येत आहेत. याची दखल राज्य सरकार घेणार का हा खरा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला असला तरी महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात सामील होण्याचा विचार करत आहेत. ही बाब महाराष्ट्राच्यादृष्टीने तसेच तालुक्याच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील विशेष करून तडवळ भागात ही परिस्थिती आहे. पान मंगरूळ, अंकलगे, करजगी, आळगी, गळोरगी, नागणसूर, तोळणूर यासह २३ गावे यासाठी आक्रमक झाली आहेत. यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्नाटक सीमा व भीमा नदीकाठची पाच गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. तशी एकूण २८ गावे आहेत. त्यांनी ठराव पण करून
घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, हा भाग कायम महाराष्ट्र सरकारकडून दुर्लक्षित राहिला आहे.केवळ आम्ही मतदानासाठीच आहे का ? या भागातील रस्त्यांची दुरवस्था अतिशय वाईट आहे.पाण्याची समस्या कायम आहे. विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतीविषयक अनुदान, नुकसान भरपाई, उजनीचे पाणी नाही, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत असे अनेक मुद्दे दुर्लक्षित आहेत म्हणून आमची इच्छा कर्नाटक जाण्याची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रा – कर्नाटक सीमावाद हा जरी सर्वोच्च न्यायालयात असला तरी केवळ सुविधा नसल्यामुळे कर्नाटकात जाण्याची इच्छा या ग्रामपंचायतीची आहे, असे कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी सांगितले. केवळ महाराष्ट्र सरकार सीमा भागातील नागरिकांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही कर्नाटकात जाण्याची भूमिका स्वीकारली आहे,असेही ते म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली अजूनही या भागात नीट रस्ते नाहीत. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही, असे कर्नाटक रक्षणा वेदिके सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मल्लिनाथ करपे यांनी सांगितले. इतर ठिकाणचे लोकांना याबद्दल काही वाटत माहिती नाही पण सीमा भागातील लोकांना कर्नाटकात का जावे असे वाटते. याबद्दल महाराष्ट्र सरकारने विचार करण्याची गरज आहे.
आम्हाला जर सोयी सुविधा चांगल्या मिळाल्या तर आम्ही कर्नाटकात जाण्याचा विचार का केला असता याचा विचार आता राज्य सरकारने करावा, असे आळगीचे सरपंच महांतेश हत्तुरे यांनी सांगितले. एकूणच काय तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जरी दोन राज्यांमध्ये पेटलेला असला तरी या गावाने कर्नाटक जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने हे प्रकरण आणखी चिघळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.