सोलापूर: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, लॉकडाउनची गरज पडू देऊ नका असे आवाहन वजा इशारा दिला होता. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याबाबत वक्तव्य केले आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात असून परंतु, नारिकांनी बेफिकीर न राहता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. सध्या लॉकडाउनचा कोणताही विचार नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशी कोणतीही मागणीही करण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ग्रामीणमधील 40 हजार 29 व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एक हजार 173 जणांचा मृत्यू झाला असून आता 267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 12 हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी अकरा हजार रुग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे शहरातील 647 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या साडेचारशेहून अधिक रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी हात साबण व पाण्याने नियमित स्वच्छ धुवावेत, मास्कचा नेहमी वापर करावा, इतरांपासून किमान सहा फुटांपर्यंत अंतर ठेवून बोलावे, आजार न लपविता वेळेत उपचार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.