ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुदत संपली तरी ८ कोटींच्या रस्त्याचे काम अर्धवट; अक्कलकोट रिपाईने दिला आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट शहरातील मंगरूळ हायस्कूल ते शिवपुरी (बंजारा चौक) पर्यंतच्या रस्त्याचे काम मुदत संपले तरी सुरूच आहे.रस्त्याचे कामे ७० टक्के अपूर्ण आहे त्यामुळे फेरनिविदा करावी तसेच या ठेकेदाराला काळया यादी टाकावे, अशी मागणी अक्कलकोट रिपाईच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला आहे. याकडे मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

तब्बल ८ कोटी ३७ लाखांच्या या रस्त्याचे काम मुदत संपुनही आजरोजी सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम नेमके पूर्ण होणार तरी कधी असा सवाल नागरिकही विचारत आहेत. राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ऑगस्ट २०२१ मध्ये नगराध्यक्ष शोभा खेडगी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये एका कंपनीला काम देण्यात आले.

आज घडीला काँक्रीट रस्त्याचे काम केवळ ३० ते ३५ टक्के झाले आहे. गटारीचे काम वगळता काही झाले नाही. ठिक – ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. प्रत्यक्षात हे काम देखील अंदाजपत्रकापेक्षा १४.४० टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. वास्तविक पाहता आता या कामाची मुदत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपली आहे. तरीही सुरूच आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कामात गटार खोदकाम व बांधकाम, रस्ता दुभाजक, बाजूला दोन लेन, २५ मीटर रुंदीचा हा रस्ता समाविष्ट आहे. त्याची लांबी ०.८१ किलोमीटर आहे.

शिवपुरी,स्टेशन रोडकडे आणि जेऊरकडे जाणाऱ्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. हजारो वाहने या रस्त्यावरून जात असतात. तालुक्याच्या दक्षिण भागाला जोडणारा रस्ता आहे. त्यात शिवपुरी हे एक तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. या ठिकाणी परदेशातील भाविक ही येतात. अक्कलकोट रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनाची गर्दी खूप असते. सध्या मात्र अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य व खड्ड्यांचा बाजार आहे.

पालिकेच्या या बेफिकीरीबद्दल अक्कलकोटकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुदत संपूनही आत्ता कामाला सुरवात केले असल्याने सदर मक्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सदर कामाची ई-निविदा परत एकदा काढण्यात यावे. अन्यथा पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मडिखांबे यांनी दिला आहे.

धुळीचा नागरीकांना त्रास

शिवपुरी जवळ गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिक रस्त्यावरून जाताना पडत आहेत. धुळीने तर अक्षर:शा नागरिक वैतागले आहेत. खरे तर रोज त्यावरती पाणी मारणे बंधनकारक आहे परंतु ठेकेदाराकडून कसल्याही प्रकारे काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!