ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

मुंबई : देशाच्या राजकीय पटलावरील अनेक नेत्यांच्या सहचारिणींचे स्वतःचे कार्यकर्तृत्व तसेच संबंधित नेत्यांच्या यशात असलेले योगदान उलगडून दाखविणाऱ्या ‘सखी सूत्र’ या मेधा किरीट सोमैया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या हिंदी, मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १४) राजभवन येथे झाले.

कार्यक्रमाला आभासी माध्यमातून माजी राज्यपाल राम नाईक, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, माजी खासदार किरीट सोमैया हे उपस्थित होते. तर राजभवन येथे प्रत्यक्ष कार्यक्रमाला मेधा किरीट, नयना विनय सहस्रबुद्धे, इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमये, रतन शारदा व विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर आदी उपस्थित होते.

‘सखी सूत्र’ या पुस्तकातून लेखिका मेधा किरीट यांनी कौटुंबिक तसेच राष्ट्रीयतेचा भाव जागविला असून सहज सुलभ भाषेत विविध नेत्यांचे तसेच त्यांच्या सहधर्मचारिणींचे कार्य दर्शविले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एका व्यक्तीला जरी प्रेरणा मिळाली तरी देखील हे पुस्तक यशस्वी आहे, असे उद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले.

साप्ताहिक विवेक मध्ये मेधा किरीट यांच्या प्रकाशित झालेल्या ‘सखी सूत्र’ या स्तंभातील लेखांचे संकलन असलेल्या या पुस्तकामध्ये श्रीमती उषा व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, डॉ. प्राची व प्रकाश जावडेकर, नीलम व राजीवप्रताप रुडी, सीमा व पियुष गोयल, कांचन व नितीन गडकरी, यांसह भाजपचे कार्याध्यक्ष जे पी नडडा, डॉ विनय सहस्रबुद्धे, डॉ अनिल सहस्रबुद्धे, डॉ सत्यपाल सिंह, डॉ विजय चौथाईवाले डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांचा कौटुंबिक जीवनपट दाखविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!