ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची धडक कारवाई, ७८ जणांचा अँटीजन टेस्ट, सर्व अहवाल निगेटिव्ह

गुरुशांत माशाळ

दुधनी दि. १८: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या बरोबर कोरोना मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. तरीही काही बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुधनी नगर परिषद, तालुका आरोग्य प्रशासन यांच्या सहकार्याने दुधनी शहरात सकाळी अकरा वाजता धडक मोहीम राबविण्यात आली.पोलिसांनी धरपकड सुरू करताच विनाकारण फिरणाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती.

यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विचारणा करण्यात आली. दुचाकी आणि चारचाकी वाहनात फिरणाऱ्यांना पकडून अँटीजन टेस्ट करून सोडून देण्यात आले. दुधनीत एकूण ७८ जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती आरोग्य सहाय्यक पंचप्पा बळुंडगी यांनी दिली.

या धडक कारवाईवेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक छबु बेरड, पोलीस हवालदार संजय जाधव, अजय भोसले, सुरेश लामाजणे, एजाज मुल्ला, महादेव शिंदे, आरोग्य सहाय्यक पंचप्पा बळुंडगी, जयवीरेंद्र एकांडे, संतोष माशाळ, राजेंद्र चौगुले, विलास पोतदार यांचा समावेश होता. दुधनी शहरात मंगळवारी सकाळपासून पोलीस प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिष वाळुंज हे देखील मागील काही दिवसांपासून ऍक्शन मोडवर आले असून दंडात्मक कारवाई करत आहेत. मुख्याधिकार्यांनी वेळोवेळी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, बाजारात गर्दी करू नका, कायदा उल्लंघन करून दुकाने उघडू नका अशी विनंती करून देखील कायद्याचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून काही दुकाने सील देखील केले आहेत. कारवाई दरम्यान नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी, सुधीर सर्वगौड, मल्लिनाथ म्हेत्रे, चन्नमल्लप्पा पाटील, रामचंद्र अत्ते, गुरुशांत मगी, शांतलिंग चिंचोळी, मौलप्पा गायकवाड हे सहकार्य करीत आहेत.

“सद्या अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका आरोग्य विभाग, दुधनी नगर परिषद यांच्या सहकार्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस प्रशासन मार्फत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. जो कोणी विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येईल” – पोलीस निरीक्षक राजेश गवळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!