दुधनी दि.०२ जून: दुधनी शहरात सद्या चार रूग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली. सद्या शहरात नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रॅपिड अँटीजन टेस्टिंग केली जात आहे त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक ०१ मार्च २०२१ पासून दुधनी शहरात एकूण ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २९ जणांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात करून घरी परतले आहेत. तर ४ जणांची मृत्यू झाली आहे, अशी माहिती डॉ. करजखेडे यांनी दिली.
रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी शहरात पोलीस प्रशासनाच्या सहायाने शहरात कडक बंदोबस्त ठेवली आहे.मास्क व सानिटायझरची सक्ती केली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणं सोडून घरी राहण्यास पसंती दिली आहे. यामुळे दुधनी शहर कोरोना मुक्त होण्यास सुरुवात होत आहे.