ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तिसऱ्या लाटेच्या पूर्वी जिल्ह्यात १२ लाख बालकांची होणार तपासणी, अक्कलकोटच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

अक्कलकोट, दि.३ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बारा लाख बालकांची आरोग्य तपासणी होणार असून या मोहिमेला अक्कलकोट
येथे देखील लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. संभाव्य तिसऱ्याला लाटेसाठी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

कोरोनाच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समिती येथे आढावा बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते. आत्तापर्यंत अक्कलकोट तालुक्याने कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने केला आहे. तिसर्‍या लाटेतही अशा पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.या मोहिमेच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी माहिती घेतली.

पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक,दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीय आणि तिसर्‍या लाटेत लहान मुलांना याचा धोका आहे.तिसरा लाटेची पूर्वतयारी म्हणून अक्कलकोट तालुक्यात असलेल्या बालकांची संख्या, उपलब्ध साधनसामुग्री, वैद्यकीय सुविधा याचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना विविध मुद्द्यावर मार्गदर्शन केले.तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीमधील व ६ ते १४ वर्ष वयोगटातील शाळेतील बालके यांच्या आरोग्य तपासणीबाबतचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.या बैठकीला निवडक अंगणवाडी पर्यवेक्षक ,केंद्रप्रमुख , शिक्षक , डॉक्टर उपस्थित होते.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बालकांची आरोग्य तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. एखाद्या बालक संशयित आढळला तर बाल रोग तज्ञकडुन तात्काळ त्याची तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर अन्नछत्र येथील कोविड सेंटर ला भेट रुग्णाची विचारपूस केली व ताण तणाव व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी गट विकास अधिकारी भारत एवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, गट शिक्षण अधिकारी अशोक भांजे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड ,विस्तार अधिकारी महेश भोरे,डॉ.गजानन मारकड डॉ.माळी , आरोग्य कर्मचारी काझी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

★ कोरोना रुग्ण आणि डॉक्टरांचे वाढविले मनोबल

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ‘ताणतणाव’ या पॅटर्नची चर्चा राज्यभर सुरू आहे.अशा स्थितीमध्ये त्यांनी आज पुन्हा अक्कलकोटमधील कोरोना सेंटरवर जाऊन तेथे काम करणाऱ्या डॉक्टर व रुग्णांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी करत असलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!