गुरुशांत माशाळ
दुधनी दि.३ जून : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सिन्नुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गांधीनगर तांडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पुर्ण झाले आहे. परंतु सोयीसुविधा भावी नागरिकांची मोठी अडचण होत आहे याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे .या उपकेंद्रात एक आरोग्य अधिकारी, दोन आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि एक अर्धवेळ परीचर हे गेल्या सहा महीन्यापासून दिवसातून एक – दोन तासांसाठी का होईना काम करत आहेत. मात्र त्यांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात औषधे ठेवण्यास रॅक, दप्तर ठेवण्यासाठी टेबल आणि बसण्यास खुर्च्या उपलब्ध नाहीत. यामुळे येथे काम करताना कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावे लागत आहे.
या ठिकाणी अधिकारी व कर्मचार्याना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. परीसरात अस्वच्छता पसरली आहे. बांधकाम नवीन असले तरी खिडक्यांचे काचा फुटले आहेत. दरवाजे तुटले आहेत. उपकेंद्रात जाण्यासाठी नीट रस्ता नाही.
या उपकेंद्रांतर्गत शिवाजी नगर तांडा, गांधीनगर तांडा, म्हेत्रेनगर तांडा एक व दोन भिमनगर, सिन्नुर व चिंचोळी इत्यादी गावे येतात. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. जिल्ह्यात कलम १४४ लागु असल्याने एखाद्या
रुग्णाला उपचारासाठी बाहेर पडायची गरज असल्यास जाता येत नाही.या उपकेंद्रात सर्व सुविधा उपलब्द करून दिल्यास या भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार करून घेण्यास मदत होणार आहे.
पाण्याच्या समस्याबाबत सिन्नुर ग्रामपंचायतिला निवेदन देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने सदर उपकेंद्र सर्वसुविधांसहीत चालू केल्यास याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे. आरोग्य विभागाने तातडीने लक्ष्य घालून लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातुन होत आहे.
★ मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यात सरकारने लॉकडाऊन लागु केला आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास आम्हाला रिक्षातुन किंवा दुचाकीवरून दुधनी शहरातील दवाखान्यात जावे लागते. तांड्या जवळच ग्रामीण पोलिसांनी चौकी उभारली आहे. त्यामुळे आम्हाला गावात जाताना पोलिसांसोबत वाद घालावे लागते. आमच्या भागातील ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयींयुक्त चालू झाल्यास आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे – पोमु राठोड, ग्रामस्थ शिवाजी नगर तांडा.
★ दुधनी ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपक्रेंद्रातील प्रलंबीत सर्व कामे पुढील दहा – बारा दिवसात बांधकाम विभागाकडून पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. ते पुर्ण होताच आम्ही ग्रामस्थांच्या सेवेत दाखल होवु .
– डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी अक्कलकोट