ॲटोरिक्षा परवानाधारकांनी सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन ; 12 हजार 800 परवानाधारकां पैकी 6 हजार 199 अर्ज प्राप्त
सोलापूर, दि. 3 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ॲटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपली माहिती कोणतीही कागदपत्रे न जोडता भरावी. जिल्ह्यात 12 हजार 800 ॲटोरिक्षा परवानाधारकांपैकी 3 जूनपर्यंत 6 हजार 199 अर्ज प्राप्त झाले असून उर्वरीत परवानाधारकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे.
शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत कार्यप्रणाली विकसित केली आहे.
https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या प्रणालीवर सहज अर्ज करता येतो. या प्रणालीत रिक्षा परवानाधारकाला स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक याची नोंद करावी लागणार आहे. नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार आहे, असेही श्री. डोळे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ऑनलाईन 1041 अर्ज प्रमाणित केले असून 317 नाकारले आहेत. उर्वरित अर्जावर त्वरित कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी आणि मोबाईल क्रमांकाशी जुळतील, त्यांचे अनुदान त्वरित संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्यांचे आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनी अनुज्ञप्ती विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे केंद्र चालू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
● नव्याने देण्यात आलेले किंवा 16 डिसेंबर 2015 नंतरचे नूतनीकरण झालेले जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारक अर्ज करू शकतील.
● अर्थसहाय प्राप्त करण्यासाठी आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक अकाऊंटशी जोडलेला असणे गरजेचे आहे.
● कोणत्याही ऑनलाईन अर्जात बँक अकाऊंट नंबर विचारलेला नाही, अर्जदाराने तो कोणालाही देऊ नये.
● नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
परवानाधारक रिक्षा चालकाला अर्ज करताना अडचण आल्यास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपट पाटील (8669250909) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. [email protected] या ईमेल आयडीवर किंवा कार्यालयाच्या 0217-2303099 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यालयाकडून खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही दलालाची नेमणूक केली नाही. परवानाधारकांनी अनधिकृत व्यक्तीशी संपर्क करु नये, असेही आवाहन श्री. डोळे यांनी केले आहे.