सोलापुरातील गारमेंट, टेक्सटाइल उद्योजकांसह खा. डॉ. महास्वामींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट ; संकटातील वस्त्रोद्योग क्षेत्रास तारणार
सोलापूर – सोलापुरातील वस्त्रोद्योगास कोरोना जागतिक महामारीचा फटका बसल्याने टेक्सटाइल व गारमेंट उद्योजक तथा कामगार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात उद्योजकांनी व कामगारांनी मांडलेल्या व्यथा पाहून खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत क्लस्टर विकास योजनेच्या माध्यमातून सर्व उद्योजकांना समावेशन करून मोठी मदत करणार असल्याचा निर्णय झाला आहे.
मंगळवारी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांना योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
यापूर्वी, सोलापुरात नावारूपास येणाऱ्या टेक्सटाइल व गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीतून बाहेर काढत सध्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी १४ मार्च रोजी गारमेंट उद्योगास भेट दिली होती. यातून सावरण्यासाठी यावेळी उद्योजकांनी गारमेंट असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा विचार करीत खा.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आठवड्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवत या प्रस्नी वाचा फोडली.
यावेळी क्लस्टर योजनेतून सोलापुरातील सूक्ष्म, मध्यम स्तरातील वस्त्रोद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे संकटात सापडलेल्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास खा.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी व्यक्त केला. या भेटीमुळे उद्योजकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
यावेळी सोलापूर गारमेंट असोसिएशनचे रमेश डाकलिया, प्रकाश पवार उपस्थित होते.