खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे ” शरद – प्रतिभा ” प्रतिष्ठाच्या पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर – खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासूनच गोरगरीब , झोपडपट्टी आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे आहे, असे गौरवोदगार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
‘शरद-प्रतिभा’ प्रतिष्ठान सोलापूरच्यावतीने प्रथमच यंदाच्या वर्षांपासून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूरच्या विकासात योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील महिलांचा शुक्रवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘शरद – प्रतिभा’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी , राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव,प्रतिष्ठानचे सचिव दीपक राजगे, राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, मंजिरी अंत्रोळीकर, प्रियवंदा पवार ,माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची उपस्थिती होती.
चंदाताई तिवाडी ( सांस्कृतिक ),सरिता मोकाशी ( सामाजिक ) , डॉ. मिनाक्षी कदम ( शिक्षण ), मनिषा भांगे ( कृषी ), सब्जपरी मकानदार ( उदयोग ) आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्धल डॉ. मिनल चिडगुपकर ( वैद्यकीय ) , यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला . या कार्यक्रमात सोलापूरातील गरीब व गरजू ५२ शाळकरी मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये सॅक (बॅग), वह्या, कंपास आदींचा समावेश आहे.
शरदचंद्र पवार आणि प्रतिभाताई पवार या दोघांनी खासदार सुप्रियाताई यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कामाला झोकून दिले. सुप्रियाताईंनीसुद्धा गोरगरीब व पिचलेल्या तसेच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या आणि आदिवासी भागातील लोकांना मदतीचा हात दिला. घरादारात व झोपडपट्टी भागात गेल्याशिवाय त्यांची दुःखे समजत नाहीत म्हणून सुप्रियाताईंनी अशा लोकांच्या अडचणी सोडविल्या. आजही खासदार सुप्रियाताई आपल्या बारामती मतदारसंघासह राज्यातील प्रत्येक युवतींच्या संपर्कात राहतात हे विशेष आहे. शरदचंद्र पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी खासदार सुप्रियाताईंवर केलेल्या संस्काराची शिदोरी सोबत घेऊनच आज त्या राजकारणात वाटचाल करत आहेत, असेही पालकमंत्री भरणे यावेळी बोलताना म्हणाले.शरद-प्रतिभा प्रतिष्ठानच्या पहिल्याच कार्यक्रमाचे कौतुक करताना पालकमंत्री भरणे यांनी प्रतिष्ठान सर्वतोपरी सहकार्य व मदतीचे आश्वासन देत खंबीरपणे प्रतिष्ठानच्या मागे उभे राहण्याची ग्वाही दिली.
समाजात आज स्रियांचा मान आणि सन्मान राखला जात असल्याबद्धल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आभार मानले. नेहरू आणि गांधी यांनी महिलांना सोबत घेऊन काम केले. तर आजही सोलापूर जिल्ह्यात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे सांगत स्वातंत्र्य चळवळ,राजकारण तसेच विधानसभेतसुद्धा जिल्ह्यातील स्त्रियांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी महिलांना सर्वच क्षेत्रात ५० टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. असे असले तरीसुद्धा आज स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार होतच आहेत.त्याची समाजात दाद घेतली जात नसल्याची खंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी व्यक्त केली . प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी स्वागत करताना सोलापूरच्या विकासाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा,वैद्यकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने शरद-प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले.महेश गादेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले,महिलांना दुय्यम स्थान मिळत असल्यामुळे तसेच आई-वडिलांच्या इस्टेटीत मुलींनासुद्धा वाटा मिळावा तसेच सर्वच क्षेत्रात महिलांना स्थान मिळावे म्हणून शरद पवारांनी देशात महिला धोरण आणले. आणि हे महिला धोरण आज प्रभावी ठरत आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार,इब्राहिम कुरेशी , अकबर हारून सय्यद, प्रतिष्ठानच्या सहसचिव श्रीमती प्रियवंदा पवार, खजिनदार दयानंद पोतदार,सदस्य मंजिरी अंत्रोळीकर,श्रीकांत शिंदे,डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे,रियाज पिरजादे, निलेश धोत्रे, लखन गावडे, सिद्धार्थ सर्वगोड, सुनील माने,शंतनू साळुंखे,शशिकांत सोनटक्के, विजयकुमार गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष व प्रतिष्ठानचे सदस्य चंद्रकांत पवार यांनी मानले.
■ पुरस्कारप्राप्त मान्यवरांची मनोगते
★ सरिता मोकाशी-
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संधी दिल्यामुळे आज बळ मिळाले. गिरणगांव आणि औद्योगिक शहर म्ह्णून असलेली सोलापूरची ओळख पुसली आहे. सोलापुरात नौकऱ्या नसल्यामुळे तरुण मुले पुणे आणि मुंबईला जात आहेत. हे लोंढे आता थांबविणे गरजेचे आहे.त्यासाठी सोलापुरातच औद्योगिक क्षेत्र उभारणे गरजेचे आहे.
★ चंदाताई तिवाडी-
भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे केलेल्या कामाचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं कौतुक आपण आयुष्यभर विसरणार नाही. कला हि लोकांच्या हृदयात ठसण्याचे काम करते. त्यामुळे हा पुरस्कार आपणास निश्चितच आणखी उभारी देणारा ठरणार आहे.
★ डॉ. मीनाक्षी कदम –
शिक्षण हे आजन्म आणि आजीवन चालणारे क्षेत्र आहे. बहुजन समाजातील व तळागाळातील मुलांसाठी मंगळवेढा आणि पंढरपूरच्या ग्रामीण भागात शाळा उघडल्या आणि आज हजारो मुले शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागासाठी शिक्षणाच्या प्रवाहाची साखळी तयार केली. शिक्षक गुणवत्ताधारक असेल तरच येणारी पिढी गुणवत्ताधारक बनते. विध्यार्थी सुसंस्कृत बनून कसा बाहेर पडेल याकडे जातीने लक्ष दिले जाते.
★ डॉ. मीनल चिडगुपकर –
आज लहान मुलींमध्ये अनेक समस्या आहेत. मात्र लाजेखातर त्या कोणाला सांगू शकत नाहीत. शाळांमध्ये तर विद्यार्थिनी बोलताना खूपच लाजतात. आईलासुद्धा अनेकदा त्या सांगत नाहीत. मासिक पाळीबाबत मुलींच्या मनामधील भीती दूर करण्यासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजनावर भर दिला जात आहे.
★ सब्जापरी मकानदार –
सुरुवातीपासूनच आपल्या नशिबी गरिबी आणि कष्ट आले . मात्र कधीसुद्धा त्याचे आपण सार्वजनिक जीवनात भांडवल केले नाही. मुलामुलींची जबाबदारी पडल्यानंतर सुरुवातीला १ लाखाच्या कर्जातून ५ कामगारांना सोबत घेऊन विट उद्योगाला सुरुवात केली. प्रामाणिकपणाच्या जोरावर या उद्योगात जम बसला. आज आपल्याकडे १ हजाराहून अधिक कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. शिवाय मुलेसुद्धा चांगली शिकली सावरली आहेत. यातच आपण समाधानी आहोत.