मुंबई: ‘कॅसेटकिंग’ गुलशन कुमार यांच्या हत्याकांडातील दोषी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट यांची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं १९ पैकी १८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यात ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश होता.
टी सिरीजचे गुलशन कुमार यांची १९९७ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला विशेष मोक्का कोर्टाने २००२ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. रौफचा भाऊ रशीद मर्चट यालाही दोषी धरत शिक्षा सुनावली आहे.
या निर्णयाला राज्य सरकारनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. तेव्हा, तौरानी यांना न्यायालयानं दिलासा देत त्यांच्या विरोधातील राज्य सरकारचं अपील फेटाळून लावलं. तर आणखी एक निर्दोष आरोपी अब्दुल रशीद दाऊद मर्चंट विरोधातील अपील अंशत: मान्य करत त्याला शिक्षा सुनावली आहे.