अक्कलकोट (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन तसेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर, सोलापूर जिल्हा प्रभारी रंजीत सुळ, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन चक्का जाम करण्यात आले त्यामुळे सुमारे दोन तीन किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन मणेर, उपाध्यक्ष बशीर काझी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अकबर मुजावर सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजूरके, अक्कलकोट तालुका अध्यक्ष सुरेश गुत्तेदार युवक आघाडी अध्यक्ष दाजी कोळेकर, विधानसभा संपर्कप्रमुख शिवानंद गाडेकर, मोहोळ तालुका अध्यक्ष नागनाथ हजारे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भीमा वावरे, परमेश्वर पुजारी यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर म्हणाले की राज्यात गेल्या पंधरा महिन्यापासून ओबीसीचे आरक्षण कमी करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शासनाकडून अहवाल मागितला होता पण राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण कमी करण्यात आले आहे त्याचा फटका सर्व ओबीसी समाज बांधवांच्या राजकीय घडामोडीवर होत आहे. तरी राज्य शासन यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन ओबीसीचे आरक्षण पूर्वस्थितीत ठेवावे अन्यथा यापेक्षाही उग्र आणि तीव्र आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा गंभीर इशारा जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिला आहे.