दुधनी : दुधनी येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली. आणि दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसापासून दुधनी आणि परिसरातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. दुधनी आणि पंचक्रोशीत जुलै महिना लोटला तरी दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे या परिसरातील शेतकरी एखाद्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते.
हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर आणि चांगल्या प्रकारे येणार असल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला प्रत्यक्षात काही प्रमाणात पाऊस बरसला होता. त्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खते – बियाणे कर्ज काढून खरेदी केली आणि पेरणी केले होते. आणि काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तूर, मटकी यासह इतर खरीप हंगामातील इतर धान्यांची पेरणी केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी उगलेले ईवलेसे पिके करपू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले होते.
पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे.
मात्र आता पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाच्या जोरदार आगमनाने शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने पुनश्च हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांना हा पाऊस पूरक ठरणार आहे. हा पाऊस जवळपास अर्धा तास बरसला. त्यामुळे शेतातील पिकांच्या सालीमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.