ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्राण्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा- अतुल भातखळकर

मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, घटनेचा व्हिडीओ ट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाई जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, एकाच बैलगाडीवर वीसपेक्षा जास्त लोक बसून बैलांसोबत क्रूर वागणूक देत त्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात काँग्रसच्या आंदोलनात कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे असे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अशा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या आंदोलनाच्या वेळी अत्यंत ज्वलनशील असलेल्या गॅस सिलेंडरचा सुद्धा वापर करण्यात आला होता. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता भाई जगताप यांच्यासह सर्व आंदोलकांवर प्राणी क्रूरता कायद्याच्या कलम ११ व भारतीय दंड संहिता कलम ४२८ नुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!