वॉशिंग्टन: सूर्याच्या पृष्ठभागावर तयार झालेले शक्तीशाली सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या वादळाचा वेग १६ लाख ९ हजार ३४४ किमी प्रतितास इतका प्रचंड असून हे सौर वादळ रविवारी अथवा सोमवारी कुठल्याही क्षणी धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सौर वादळामुळे सॅटेलाइट सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. असा इशारा वैज्ञानिकांनी दिला असून विमान उड्डाणे, रेडिओ सिग्नल, संपर्क यंत्रणा आणि हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच स्पेसवेदर डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील एका भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
उत्तर आणि दक्षिणकडील अक्षांशावरील देशांतील नागरिकांना रात्री सुंदर अरोरा दिसू शकतो. १९८९ मध्ये आलेल्या सौर वादळामुळे कॅनडातील क्युबेक शहर १२ तासांसाठी अंधारात बुडाला होता. यामुळे लाखो लोकांना त्रास झाला होता.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अंदाजानुसार, हे सौर वादळ १६ लाख ९ हजार ३४४ किमी प्रतितास इतक्या वेगाने येत असून यापेक्षाही अधिक वेग असण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. तसेच अंतराळात महावादळ आल्यास याचा परिणाम थेट पृथ्वीवर होऊ शकतो. वीज गेल्याने अनेक शहरे अंधारात बुडण्याची शक्यता आहे. सौर वादळामुळे पृथ्वीबाह्या वातावरण अधिक उष्ण होऊ शकते. त्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होण्याची शक्यता आहे.
यामध्ये जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीच्या प्रसारण यंत्रणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच विद्युत वाहिनीत प्रवाह अधिक होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडू शकतात. मात्र, अशी घटना फार क्वचितच घडत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अशावेळी सुरक्षा कवच म्हणून काम करते.