मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटले? या भेटी मागे काय कारण असावं ? या संदर्भात विविध प्रकारच्या तर्क वितर्क लावण्यात येत होते. आता या सर्व प्रश्नांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली नव्हती, फक्त फोनवर बोलणं झालं होत. रेग्युलेटरी अॅक्टमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते बँकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे बॅकिंग रेग्युलेटरी कायद्यात जे बदल करण्यात आले आहेत. ते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ए. के. एंटोनी, राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशातली कोरोना परिस्थिती, महाराष्ट्रात कमी पडणारा लस पुरवठा, कोरोनावरच्या उपाय योजना याबाबतही शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांमध्ये तथ्य़ नाही. शरद पवार यांची आणि पियुष गोयल, राजनाथ सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
बॅकिंग रेग्युलेटरी कायद्यात जे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे सहकारी बँक ही एखाद्या धनाढ्य माणसाच्या ताब्यातही जाऊ शकते. सहकार क्षेत्र सध्या वेगळं करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा जो निर्णय घेतला गेला आहे त्या निर्णयामुळे सहकारी संस्था, बँका यांना स्वायत्तता देण्यासाठी घटनादुरूस्ती करण्यात आली होती. मात्र बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टच्या अंतर्गत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे मर्यादित अधिकार RBI कडे आहेत. मात्र बदलांमुळे काय काय घडू शकतं याचं एक लेखी पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी दिलं. जे मुद्दे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं त्याबद्दल ते सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.