तुळजापूर : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरूजी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी आज सोमवारी पहाटे दीर्घ आजारानं निधन झाले. आलुरे गुरुजी यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
आलुरे गुरुजी यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता. बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू होऊन तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून १९९० साली निवृत्त झाले.
शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात ते सहभागी झाले होते. तुळजापूरला अभियांत्रिक कॉलेज उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती.