ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्याख्याते सुनील मचाले ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त ; मानपत्र देऊन विद्यालयातर्फे झाला गौरव

आकुर्डी  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे येथील कर्तव्यदक्ष शिक्षक तथा अभ्यासू व्याख्याते सुनिल विश्वनाथ मचाले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा विद्यालयातर्फे मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

एक व्याख्याता म्हणून विज्ञान विभाग प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला होता.  कर्मनिष्ठ, आचारनिष्ट आणि कर्तव्यनिष्ठ अशा अनेक गुणांनी ते समृद्ध होते. सालस, मितभाषी, निगर्वी, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय शिक्षक असणारे सुनील मचाले यांचा जन्म ७ जुलै १९६३ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण विद्या विकास हायस्कूल अचलेर येथे झाले.

छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथून १९८४ साली त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. १९८६ साली श्री संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथून पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोकरी करत असताना बी.एड हे व्यावसायिक शिक्षण घेतले .त्यानंतर १७ सप्टेंबर १९८७ रोजी सासवड येथील महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाले.  त्यानंतर अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर,  श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी येथे कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात एच. एस. सी. बोर्डाचे नियामक, सीईटी पेपर सेटर म्हणून काम केले आणि त्यांनी राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

आपला वक्तशीरपणा, सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी, अंतर्मनातील आपल्या कर्तव्य पोटी असलेली शिक्षणाबद्दलची तळमळ ही नेहमी त्यांच्या सेवेत चर्चेत राहिली. ३१ जुलै रोजी त्यांना विद्यालयातर्फे मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!