मुंबई, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम उपसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.
राजशिष्टाचार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर निखाळे, युवराज सोरेगांवकर, राजशिष्टाचार अधिकारी भरत जैन, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.सिंघल, पोलीस उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त निमित गोयल, पोलीस उपायुक्त श्री.मीना, पोलीस उपायुक्त (परिवहन) योगेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.