ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बैलगाडी शर्यत तर होणारच, आमदार गोपीचंद पडळकर

सांगली : कोर्टाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातलेली असताना देखील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पडळकरांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, यावेळी झरे परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी सरकार कामाला लागली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून वातावरण तापले आहे. सांगली जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे (ता. आटपाडी) या गावी तळ ठोकून आहे. नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांनी शर्यतीसाठी तयार केलेले मैदान पोलिसांनी जेसीबी लावून उकरून टाकले आहे. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तर ठरलेल्या दिवशी (20 ऑगस्ट) बैलगाडी शर्यत होणारच, अशी ठाम भूमिका आमदार पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी बैलगाड्यांच्या शर्यती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा बंदी असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने झरे परिसरात बैलगाड्या शर्यती होऊ नये यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. बैलगाडी मालकांना समजावून सांगणे, नोटिसा देणे, तसेच गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सुरू केली आहे.

याप्रकरणी बोलताना पडळकर म्हणाले की, ‘येथे शर्यतीत सहभागी होण्यासाठी शेतकरी व बैलगाडा शर्यतप्रेमी येत आहेत अफगाणिस्तानमधून कोणी तालिबानी येत नाहीत, ही शर्यत खिलार गोवंश वाचवण्यासाठी घेतली जात आहे.’ असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. बैलगाडा छकडा शर्यत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे. राज्य सरकारची परवानगी नसताना बैलगाडा शर्यत घेणारच असे म्हणणारे गोपीचंद पडळकर चमकोगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी.’ अशी मागणी सचिन खरात राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!