ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात – नारायण राणे

मुंबई  : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरुन मंगळवारी राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळला. नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्याब नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. नारायण राणे यांना काल रात्री उशिरा जामीन मंजूर झाला.

या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

ज्यांना देशाचा स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती नाही, त्यांनी चेष्टा करावी हे सहन न झाल्यानेच माझ्या तोंडून ते वाक्य आले असे म्हणत नारायण राणेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. यावेळी बोलताना पुढचं वाक्य नेक्स्ट टाईम असे म्हणत मी माझी बाजू मांडली असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांसमोर दिले.

मी असं काय बोललो होतो, ज्याचा राग आला. ते वाक्य मी आता परत बोलणार नाही. कारण कोर्टात केस चालू आहे असे नारायण राणे म्हणाले. यावेळी शिवसेनेवर शरसंधान साधताना तुम्ही कुणीही माझं काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझाही वाटा आहे. तेव्हा यापैकी कुणी नव्हते. ज्यांनी अपशब्द वापरले तेही तेव्हा नव्हते असेही राणे म्हणाले. तुम्ही सर्वांनी अनिल परब यांची कॅसेट पाहिली असेल. अधिकाऱ्यांना आदेश देता, पकडा त्याला. अरे काय डकैती केलीय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य कुठे आहे असे राणे म्हणाले.

राणेंचा कोथळा बाहेर काढीन असा इशारा शिवसेना आमदाराने दिल्याचे सांगितल्यावर आयुष्यात कधी उंदीर नाही मारला, कसले कोथळे? त्याला दाखवावे लागेल कोथळे कसे असतात असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटल्याविषयी बोलताना हे जरा शरद पवारांना सांगा असे राणे म्हणाले. कुणाची पाठ थोपटताय, मार खाऊन आले होते ते असेही ते म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!