ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट विधानसभा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी

अक्कलकोट  : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयाकडून अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली.

त्यानुसार ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दुबार अथवा समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.

दि.१ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दि.१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील, असे मतदार तसेच ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ ला अठरा वर्ष पूर्ण होतील, अशा सर्व पात्र व्यक्तींना नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच संबंधित बीएलओ यांच्याकडे देखील अर्ज सादर करता येणार आहे.

दि.२० डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. तसेच ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शिरसाट यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार संतोष कांबळे,निवडणूक संकलन प्रमुख जी. व्ही हिरेमठ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!