ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हद्दवाढमधून मिळणारे उत्पन्न त्याच भागात वापरावे, आ. सुभाष देशमुख यांची संकल्पना; आयुक्तांना दिली सूचना

सोलापूर : सोलापूरची हद्दवाढ होऊन 30 वर्षे झाली. जवळपास यात  मजेरवाडी, कुमठेसह 14 गावांचा  समावेश झाला आहे. या 14 गावातून महापालिका मिळणारे उत्पन्न त्याच गावात वापरावे, जेणेकरून एक गावसुद्धा मॉडेल बनू शकते,  अशी संकल्पना आ. सुभाष देशमुख यांनी मांडत याचा विचार आयुक्तांनी करावा, अशी सूचना  केला.
सोलापूर महापालिका हद्दवाढ भागातील समस्या व येथील विकासकामांचा आढावा  संदर्भात  आ. देशमुख यांनी महापालिकेत दुसरी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, आयुक्त पी. व्ही. शिवशंकर भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगर अभियंता कारंजे आदी उपस्थित होते.

आ. देशमुख म्हणाले की, भाजपची सत्ता असताना राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून येथील या भागातील रस्ते, ड्रेनेजसह विविध कामे केली. मात्र सध्या हद्दवाढ भागाला निधी कमी मिळत आहे.  या भागात अद्यापही अनेक समस्या आहेत. या भागातील भाजपचे नगरसेवक ते वेळोवेळी आयुक्तांना सांगत आहेत, त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, राज्य सरकारकडे  आताच नवीन सर्वे करून 75 कोटींचा रस्त्याचा आराखडा सादर केला आहे, त्याचा पाठपुरावा करावा, हद्दवाढमध्ये पाच ते सहा दिवसाआड पाणी येत आहे, ते तीन दिवसाआड येते का त्याचे नियोजन करावे, पाणी साठवण्याच्या नवीन टाक्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा, विजापूर रोड ते होटगी रोडमधील रस्ता चौपदरी करावा, डी मार्ट जवळील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे, त्याचा बंदोबस्त करून तेथे ओपन जिम, नाना नानी पार्क, चिल्ड्रन पार्क करावे, जुळे सोलापूर भागात नाट्यगृहाची स्थापना करावी, सिद्धेश्‍वर वनविहार येथे पिकनिक पॉईंट करावा, जुळे सोलापुरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, जागोजागी गॅस पाईपसाठी रस्ते खोदले आहेत, ते त्वरित बुजवावेत,  आसरा येथील पूल लहान आहे, त्याचे रूंदीकरण करावे, जुळे सोलापुरात बसस्थानकासाठी प्रयत्न करावेत आदी सूचना आ. देशमुख यांनी केल्या. या सूचनांचा पाठपुरावा नगरसेवकांनी करावा, असेही यावेळी आ. देशमुख म्हणाले.  यावेळी महापालिकेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!