मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सीबीआयचा अहवाल लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल, अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत.
सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जावयाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक म्हणाले की, त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी कोणतेही नियम किंवा कार्यवाही केली गेली नाही. वरळी येथील निवासस्थानापासून ते कुटुंबासह बाहेर जात होते. मग अचानक 10-12 लोक आले आणि त्यांना ताब्यात घेतले. हे कायद्याचे राज्य आहे की राज्यकर्त्यांचे राज्य? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
आदल्या रात्री उशिरा सीबीआयने त्यांच्याच विभागाचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे. तिवारी यांनी लाच घेऊन अनिल देशमुख यांच्या वकिलाला कथित तपास अहवालाची प्रत लीक केल्याचा आरोप आहे.
गेल्या आठवड्यात सीबीआयच्या चौकशी अहवालाचे एक पान मीडियामध्ये लीक झाले होते, ज्यात अनिल देशमुख यांना कथितरित्या क्लीन चिट देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.