तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट शहरात येत्या दोन दिवसात फत्तेसिंह चौक ते समाधी मठ हा वनवे पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नूतन पोलीस निरीक्षक राष्ट्रपती पदक विजेते अनंत कुलकर्णी यांनी दिली. गुरुवारी, अक्कलकोट शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी अनंतराव कुलकर्णी यांचा सत्कार केला.त्यावेळी व्यापाऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या संदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी सराफ असोसिएशनचे निनाद शहा, इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे गजानन पाटील, भारत मेडिकलचे निरंजन शहा आदींनी चर्चा केली.पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, अक्कलकोट हे तीर्थक्षेत्राचे शहर आहे. या ठिकाणी शिस्त असणे गरजेचे आहे. या ठिकाणची शिस्त ही परगावच्या भाविकांना प्रेरणा देत असते. त्यामुळे सीसीटीव्ही हे तर चार दिवसात सुरू होणार आहेतच, पण मुख्य मंदिराकडे जाणारा रस्त्यारील ट्राफिक कमी करण्यासाठी वन वे ची देखील प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी हा उपक्रम राबवला होता आणि तो यशस्वी देखील झालेला होता .त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी करायला हरकत नाही. त्यावेळी सर्व व्यापारी बांधवांनी सर्वांनी सहकार्य केले, तशाच प्रकारचे सहकार्य यापुढे देखील सर्वांचेअपेक्षित आहे ,अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. जिथे पोलिसांची गरज आहे तिथे नक्कीच
पोलिस काम करतील परंतु जिथे पोलिसांना लोकांची साथ हवी आहे, त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा पुढे आले पाहिजे ,साथ दिली पाहिजे, अशी भूमिका पोलिसांची आहे.
या पूर्वीचे उत्तर पोलिस स्टेशनचे कामकाज पाहता जनतेने भरभरून साथ दिली आहे, असे लक्षात येते. तशाच प्रकारचे सहकार्य मला देखील जनतेनी करावे ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यापुढच्या काळात विविध संस्था ,सामाजिक संघटना यांच्याबरोबर चांगले उपक्रम घेवून शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गोपनीय शाखेचे धनराज शिंदे हेही उपस्थित होते.