अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे गावाजवळ असलेल्या ओढ्यातील पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरिकही जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
या पुलाची उंची वाढवल्यास याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने संबंधित विभाग अपघाताची तर वाट पाहत नाही ना, अशी शंका आता उपस्थित करण्यात येत आहे.
पावसाळ्यात जास्त पाऊस झाला तर बोरगाव दे च्या ओढ्यातून जास्त पाणी येते त्यामुळे घोळसगावचा देखील संपर्क तुटत असतो.तसेच बोरगाव (दे) मधील बहुसंख्य शेतकऱ्यांना पावसाळ्यात ओढ्यावरील जास्त पाण्यामुळे शेताला जाऊन कामे करता येत नाहीत.बस आणि खासगी वाहतूक यांना देखील जाण्या-येण्यासाठी अडचण निर्माण होते.त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नवीन पूल मंजूर करून लोकप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.