पुणे : ईडीकडून करण्यात येणारी कारवाई म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज या अस्वस्थतेला वाचा फोडली. ‘विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात आहे. ठीक आहे. काळ येतो आणि जातो,’ असा सूचक इशारा पवारांनी आज दिला.
दरम्यान, आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवार यांनी तीव्र विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्र देऊन सहकार क्षेत्र संपवण्याचे षडयंत्र आहे, असे टीकास्त्र पवार यांनी यावेळी केले. देशात महारष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत सहकार मोठ्या प्रमाणावर आहे.
सहकाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हातात आहेत त्यामुळे ही दोन माणसे सहकार उध्वस्त होऊ देणार नाहीत. काही निर्णय, धोरणं चुकीची असतात. ती सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार ही विचारधारा आहे. ती उध्वस्त करायचा प्रयत्न कोणी करत असेल तर आपण ती टिकवण्यासाठी सक्षमपणे उभं राहायला पाहिजे, असे पवार म्हणाले.