ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरातील जेष्ठ क्रीडा पत्रकार जे. टी. कुलकर्णी यांचे निधन

 

सोलापूर,दि.२४ : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ क्रीडा पत्रकार व जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार जीवन त्रिंबक तथा जे. टी. कुलकर्णी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जे.टी कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रातील प्रसन्न व्यक्तिमत्व व कुशल संघटक हरपला आहे.कुलकर्णी यांनी 4 दशकांहून अधिक काळ क्रीडा पत्रकारितेत आपला वैशिष्टपूर्ण ठसा उमटवला.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. ते अध्यक्ष असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उदघाटन थाटात झाले होते.संघाचे अध्यक्षपद त्यांनी 2 वर्षे भूषविले त्यानंतर त्यांनी संघाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावून संघाच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावली. होटगी रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीच्या व्यवस्थापकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळून उद्योजकांच्या अडचणी सोडवल्या. सर्वांना तत्परतेने मदतीचा हात देण्याचा त्यांचा स्वभाव होता.दैनिक संचारमध्ये क्रीडा उपसंपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहून क्रीडा पान वाचनीय करण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. स्थानिक क्रीडा वृत्तबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पीटीआयवर आलेल्या इंग्रजी बातम्यांचे अचूक भाषांतर करून व आपल्याकडे असलेल्या माहितीचा वापर करून बातमी आकर्षक व वाचनीय करण्यात त्यांचा हातखंडा होता.संचारमधील गुगली हे त्यांचे सादर वाचकप्रिय ठरले होते.
क्रीडा विषयावर आठवड्यातून 1 अग्रलेखही ते लिहित असत. सोलापूरच्या अनेक कर्तृत्ववान खेळाडूंना त्यांनी न्याय दिला. सोलापुरात झालेल्या रणजी क्रिकेट सामन्याचे त्यांनी बाळ पंडित यांच्याबरोबर समालोचन केले होते. सोलापुरात झालेला देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा, महापौर चषक स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे त्यांनी सुरेख वार्तांकन करून आपली छाप उमटवली होती. सभा संमेलनाचे वार्तांकन ही त्यांनी केले होते. राजकीय नेत्यांच्या मुलाखती ही त्यांनी घेतल्या होत्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले आहे,अशा भावना सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे व सर्व पत्रकारांतर्फे व्यक्त होत आहेत.त्यांना विश्व न्यूज मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!