अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात साधेपणाने गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात ४१ तर ग्रामीण भागात ६७ असे १०८ ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून २० गावात एक गाव एक गणपती याप्रमाणे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७४ गावामध्ये १४२ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश मूर्ती आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा ढोल ताशे बँड पथक ट्रॅक्टर असा कोणताही डामडौल केल्याचे दिसले नाही. कोरोनाचे नियम पाळत अनेक मंडळांनी गणेशाची मूर्ती नेत साधेपणाने प्रतिष्ठापना केली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारपेठात म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही.कोरोना संसर्गाची जागृती नागरिकांमध्ये दिसून आली. गणेश मूर्ती खरेदीसाठी मास्कचा वापर करताना दिसून आले तर मूर्तीकाराने दरवर्षीपेक्षा यावर्षी कोरोना सावटामुळे विक्री कमी झाल्याचे सांगितले.
मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सुद्धा दिसून आली नाही. शहरातील सर्व मंडळांची गणेशोत्सवापूर्वी बैठक आयोजित करून पोलिस प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव करताना मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करावा असे, आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेत साधेपणाने गणपतीचे आगमन केले. पण नागरिकांमध्ये आनंद आणि हर्षोल्लास जाणवत होता.