मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१० : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना नियमांमुळे एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेला वाव मिळाला असून तालुक्यात ५९ ठिकाणी ही संकल्पना पुढे आली आहे. यामुळे पुन्हा एकदा तालुक्यात सार्वजनिक उत्सवासाठी ‘एकोपा’ निर्माण होण्यास मदत झाली आहे.
वास्तविक पाहता दरवर्षी तालुक्यात अनेक गावात शेकडो गणेश मंडळे गणपती प्रतिष्ठापना करत असतात परंतु यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत त्याचा विचार करून मंडळाने एक पाऊल मागे घेत ‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना पुढे आणत गावात एकी निर्माण केली आहे.त्यासाठी पोलिसांचे मोठे सहकार्य मिळाले आहे.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात ४१ तर ग्रामीण भागात ७२ असे ११३ ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तर २१ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम पुढे आला आहे. दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७४ गावामध्ये १०४ आणि एक गाव एक गणपतीची संकल्पना ३८ गावामध्ये राबविण्यात आली आहे.
यावेळी गणेश मूर्ती आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा ढोल ताशे बँड पथक ट्रॅक्टर असा कोणताही डामडौल केल्याचे दिसले नाही कोरोनाचे नियम पाळत अनेक मंडळांनी गणेशाची मूर्ती नेत साधेपणाने प्रतिष्ठापना केली.गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारपेठात म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही.
कोरोना संसर्गाची जागृती नागरिकांमध्ये दिसून आली. गणेश मूर्ती खरेदीसाठी मास्कचा वापर करताना दिसून आले तर मूर्तीकाराने दरवर्षीपेक्षा यावर्षी कोरोना सावटामुळे विक्री कमी झाल्याचे सांगितले. मूर्ती घेण्यासाठी देखील ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली नाही.
शहरातील सर्व मंडळांची गणेशोत्सवापूर्वी बैठक आयोजित करून पोलिस प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव करताना मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेत साधेपणाने गणपतीचे आगमन केले.
या सर्व परिस्थितीचा विचार करत तालुक्यात तब्बल ५९ गावात एक गाव एक गणपती ची संकल्पना यशस्वी झाली आहे.