मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित एकरुख उपसा सिंचन योजनेला डिसेंबर अखेर आणखी ५० कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. मंगळवारी, मुंबई येथे मंत्रालयात म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकारी व सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पंधरा दिवसापूर्वी माजी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी पाटील यांनी बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव कोळेकर, सचिव स्वामी, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक राजपूत, मुख्य अभियंता धुमाळ, उजनी लाभ क्षेत्राचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, भीमा कालवा मंडळाचे शिंदे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, विलास गव्हाणे, व्यंकट मोरे, रमेश चव्हाण, शिवराज स्वामी मुस्तफा बळोरगी, मोहन देडे आदी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत बोरी नदीवर बबलाद येथे बॅरेजेस बांधण्यासाठी सर्व्हे सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आणि यासाठी राखीव निधीतून ५० लाख रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. हा निधी तातडीने वितरित करून हे काम मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. एकरूख उपसा व देगाव एक्स्प्रेस योजनेच्या कामासंदर्भातही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
यामध्ये अधिकाऱ्यांनी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या सद्य स्थितीवर लक्ष घालत माहिती घेतली. त्यात २१ गावातील अर्धवट कामे पूर्ण होण्यासाठी मागणी केलेल्या १०० कोटींपैकी तातडीने ५० कोटी रुपये मिळणे गरजेचे आहेत. हा निधी डिसेंबर अखेर आपण नक्की देऊ, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच उर्वरित ५० कोटी जो निधी आहे तो मार्च २०२२ पर्यंत देऊन ही योजना एक ते सव्वा वर्षांपर्यंत मार्गी लावण्यावरही चर्चा झाली.
देगाव एक्स्प्रेस योजनेसाठी येत्या मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पपात ५० कोटी रुपयांची तरतूद होणार आहे. त्याची चर्चा या बैठकीमध्ये झाली.हा प्रकल्प देखील महाराष्ट्रातील इतर प्रकल्पाच्या दृष्टीने कमी खर्चात होत असल्याने येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावून या भागातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे. या बैठकीस सर्व विषय सकारात्मक झाले या बैठकीचे फळ अक्कलकोट तालुक्याला नक्की मिळणार आहे, असे म्हेत्रे यांनी सांगितले.
पंधरा दिवसापूर्वी जलसंपदामंत्री पाटील यांची मी भेट घेतली होती. त्यानंतर बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर पाटील यांनी माझ्याच अध्यक्षतेखाली बैठक लावून निधीची तरतूद करून या कामाला गती देण्याच्या सूचना जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार आजची बैठक पार पडली, असे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बबलाद बॅरेजेससाठी ५० लाखांचा निधी
बबलाद बंधाऱ्यातून हजारो लिटर पाणी हे कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी या ठिकाणी बॅरेजेस होणे अत्यंत गरजेचा आहे. त्यासाठी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून सर्वेक्षणानंतर हे काम तात्काळ हाती घेऊन पूर्ण करणार आहे.यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्र अजून वाढणार आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार