सोलापुरात होणार कै. आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक; सोलापूर मनपाच्या सभेत एकमताने ठराव मंजूर, – कै. आण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला निर्णय
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिले बलिदान देणारे माथाडी कामगारांचे नेते कै. आण्णासाहेब पाटील यांच्या सोलापुरातील स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य सभेत कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 25 सप्टेंबर रोजी 88 वी जयंती आहे. त्या पुर्वसंध्येला हा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेत मंजूर झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी महापालिकेकडे स्मारकाची मागणी केली होती. त्यानंतर सोलापूर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका मंदाकिनी पवार, गुरुशांत धुत्तरगांवकर, कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, भाजपचे किरण देशमुख, प्रभाकर जामगुंडे यांनी हा प्रस्ताव मुख्य सभेत मांडला होता. त्यानंतर आज झालेल्या मुख्य सभेत ही मागणी मंजूर करण्यात आली आहे.
कै. आण्णासाहेब पाटील यांचे हे स्मारक निराळे वस्ती येथील माटे बगीचा येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये राम जाधव आणि किरण पवार यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये कै. आण्णासाहेब पाटील यांचा पुर्णाकृती पुतळ्यासह संपूर्ण परिसर सुशोभीकरण करावे. तसेच कै. आण्णासाहेब पाटील यांचे जीवनकार्याची माहिती कोनशिलेच्या माध्यमातून व्हावी अशा स्वरुपाची मागणी होती. ही मागणी सभागृहात सर्वपक्षीय गटनेते तसेच विरोधीपक्षनेते आणि सभागृह नेत्यांनी एकमताने मंजूर केली.
सोलापूर महापालिकेने कै. आण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला ही मागणी मान्य केल्याने त्यांना संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने कृतीशील अभिवादन केल्याची आमची भावना आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेतील सर्व गटनेते, विरोधीपक्षनेते, सभागृह नेते तसेच सर्व नगरसेवकांचे मनपूर्वक आभार मानतो – राम जाधव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर
कै. आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान दिले असले तरी त्यांनी आठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या उन्नतीसाठी माथाडी संघटना स्थापन केली होती. त्यामुळे त्यांचे स्मारक सोलापूर शहरात होणे ही त्यांना खरी आदरांजली आहे. सोलापूर महापालिकेतील सर्व नगरसेवकांचे शतशः आभार.- किरण पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर