दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
मुंबई : आरोग्य विभागातील विविध पदाची परीक्षा अचानक रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर आरोग्य विभागाचा प्रमुख आणि मंत्री म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा आयत्यावेळी रद्द कराव्या लागल्याच्या निर्णयावर दिलगिरी व्यक्त केली. तसेच न्यासा संस्थेच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा रद्द करावी लागली, त्यामुळे न्यासाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आता या माविआ सरकारला ‘घोळ सरकार’ म्हणायचे का❓
आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अन्य राज्यातील परीक्षा केंद्रांचे प्रवेशपत्र आणि आता दलाल सक्रिय!
या दलालांची चौकशी झाली पाहिजे.
या सरकारमध्ये रोज नवीन घोळ!
माध्यमांशी संवाद.. pic.twitter.com/HE0ty6Ujzs— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2021
या प्रकरणाची 100 टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.