ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक  व्हावेत – मुख्यमंत्री

मुंबई दिनांक २९:   कोरोना विषाणुने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्व अधिकच प्रकर्षाने अधारेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक  व्हावेत  असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले तसेच नागरिकांमध्ये यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करतांना विविध अन्न घटकांचे नमुने वेळोवेळी तपासले जावेत असेही सांगितले.

भारतीय खाद्य संरक्षण आणि मानके प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती रीटा तेवटीया यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा येथील समिती कक्षात भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधानसचिव विकास खारगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय, आयुक्त परिमल सिंग,  केंद्रीय प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अरुण सिंघल, डॉ. हरिंद्र ओबेरॉय, श्री. मित्तल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात आरोग्य विभागाकडे असलेल्या असलेल्या  चाचणी प्रयोगशाळांची मदत याकामी घेता येऊ शकेल त्यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वय साधून या कामाला गती देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  राज्य आणि जिल्हास्तरावर यासंबंधीच्या बैठका नियमित स्वरूपात घेऊन अन्न सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला जावा. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण हा आज शासनासमोरील प्रधान्याचा विषय असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्यादृष्टीने परस्पर समन्वयाने करावयाच्या विविध मुद्दांवर  या भेटीत चर्चा करण्यात आली. यामध्ये भारतीय खाद्य संरक्षण आणि मानके प्राधिकरण यांच्यासमवेत  राज्य शासन करत असलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याला अन्न नमुने तपासणी प्रयोगशाळा तसेच इतर उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होऊ शकेल असे शिष्टमंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हास्तरावर अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्री. सिंग यांनी यावेळी दिली. भारतीय खाद्य  संरक्षण प्राधिकरणाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती श्रीमती तेवटीया यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!