देशी गायींसाठी राज्यात लवकरच हॉस्पिटल उभारणार;अक्कलकोट येथे गो विज्ञान परिषदेच्या कार्यशाळेला प्रारंभ
अक्कलकोट, दि.२७ : गोमातेचे संरक्षण व्हावे आणि गायीपासून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्यात लवकरच देशी गायीसाठी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुर्वेद गो विज्ञान कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक भोसले यांनी दिली.
मंगळवारी,अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन सांस्कृतिक भवनात आयुर्वेद गो विज्ञान परिषदेतर्फे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी पहिल्या टप्प्यात तर उर्वरित महाराष्ट्रात गरजेनुसार या हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे.या हॉस्पिटलच्या माध्यमातून आनाथ मालकीच्या व गोपालकांच्या गायीना उपचार दिले जाणार आहेत,असेही ते म्हणाले. निरोगी समाज बनविण्यासाठी गायीपासून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना पंचगव्यच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.पंचगव्यच्या माध्यमातून एकूण वीस प्रकारचे उत्पादन असून त्याची निर्मिती कशाप्रकारे होते त्याचे प्रशिक्षण या शिबिरात गोपालकांना दिले
जात आहे.देशपातळीवर आणि परदेशात सेंद्रिय शेती करून विषमुक्त धान्य निर्मिती करून त्याची विक्री ही जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी आणि त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावे यासाठी आयुर्वेद गो विज्ञान परिषद प्रयत्न करत आहे,असेही त्यांनी सांगितले. भोसले यांनी या परिषदेचा उद्देश आणि कार्य याबद्दल ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रारंभी या कार्यशाळेचे उद्घाटन अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी,प्रभुशांत महास्वामीजी,जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, नगरसेवक महेश हिंडोळे, महिबुब मुल्ला, दत्तकुमार साखरे,शिरवळचे सरपंच बसवराज तानवडे,सुरेश डिगगे, शिवकुमार कापसे,शकुंतला तानवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरासाठी महेश चिट्टे, राजशेखर उंबराणीकर,अप्पू दिकसंगी,वैभव हेगडे,लक्ष्मीकांत पाटील, अतुल जाधव, सचिन फुटाणे,परमेश्वर देगाव आदी परिश्रम घेत आहेत.ही कार्यशाळा दोन दिवस चालणार असून याचा लाभ जास्तीत जास्त गोपालक शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.तृप्ती डिग्गे- तानवडे यांनी केले.या शिबिरात आयुर्वेद गो विज्ञान परिषदेचे प्रमुख विवेक भोसले, स्वानंद पंडित,डॉ. प्रदिप शेळके, डॉ. संतोष वैद्य, डॉ. रविंद्र अडके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार प्रेमराज डिग्गे यांनी मानले.