सोलापूर, दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात असून आज पर्यंत 27 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले असले तरी जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गती द्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. दीपावली मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे व या काळात विशेष लसीकरण मोहीम राबवून प्रत्येक नागरिकाला लस द्यावी, असे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे परंतु धोका आणखी संपलेला नाही. कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासन राबवत असलेल्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले. तसेच लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सिरिंज ची उपलब्धता स्थानिक पातळीवर करून घ्यावी, असे ही त्यांनी सुचित केले.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा स्वास्थ्य अभियान दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणार असून यात 100% महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीही लसीकरणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तर आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या अनुषंगाने माहिती बैठकीत सादर केली.
लसीकरण –
जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण व महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 21 लाख 34 हजार 31 इतकी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 41 हजार 666 इतकी आहे. तर आज अखेरपर्यंत 27 लाख 75 हजार 697 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
100% लसीकरण झालेली गावे 71
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत 71 गावातील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यामध्ये अक्कलकोट 10, बार्शी 22, माढा 23, माळशिरस 01, उत्तर सोलापूर 05, दक्षिण सोलापूर 10 या प्रकारे तालुकानिहाय गावांचा समावेश आहे.