सोलापूर : कोरोना महामारीमुळे सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे वारी आणि वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी सध्या पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे या पद्धतीचा निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
यासंबंधी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांबरोबर कार्तिक वारी संदर्भात चर्चाही करण्यात आलेली आहे. कार्तिक वारी ही झालीच पाहिजे यंदाची कार्तिक वारी आम्ही करणारच असा निर्धार वारकरी मंडळींनी केलेला आहे. त्याच बरोबर दिंड्या, पालखी सोहळा पूर्ववत करून पंढरपूर येथील 65 एकर मध्ये असणारे सर्व सोयीसुविधा व त्या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा वारकऱ्यांना देण्यात यावी.
चंद्रभागा नदीचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरा करण्यासाठी अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावे या पद्धतीचे निवेदन देण्यात आलेले आहे .जर कार्तिक वारीला परवानगी नाही दिली तर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र बर आंदोलन उभे केले जाईल अशी ही सूचना असा संदेश लेखी निवेदनातून प्रशासनासमोर मांडण्यात आलेला आहे.
सध्या सर्व क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल झालेले आहे . कोरोनाचा प्रसार कमी झालेला असल्यामुळे कार्तिक वारीला परवानगी देऊन सहकार्य करावे या पद्धतीचे निवेदन देण्यात आलेला आहे.
हे निवेदन देत असताना अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय सचिव ह भ प बळीराम जांभळे, वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, वारकरी मंडळाचे जिल्हा सचिव ह भ प मोहन महाराज शेळके, वारकरी मंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष संजय पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.